*कुटुंबवत्सल, कार्यतत्पर, प्रेरणादायी व्यक्तिमत्व : दिनकर शिंदे*

 *कुटुंबवत्सल, कार्यतत्पर, प्रेरणादायी व्यक्तिमत्व : दिनकर शिंदे*



दिनकर अमृता शिंदे उर्फ सर्वांचे लाडके दिनूनाना. त्यांची कुटुंबाप्रती असणारी आस्था, कळकळ, सस्नेह, प्रेम, व जिव्हाळा खरं तर त्यांच्या वास्तववादी जीवनाचा प्रवास इतका छोटा नव्हता की तो एका चार पानी लेखात बसेल. तरीही या लेखाच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा मी छोटासा प्रयत्न करतोय. दिनूनाना यांचा जन्म १९५२ साली बोरगाव ता.वाळवा याठिकाणी शेतकरी कुटूंबात झाला. अमृता शिंदे  याना चार मुले.  दिनूनाना शेंडेफळ व सर्वांचे लाडकेही. इतिहास सांगतो की शिंदे घराणे मूळचे ग्वाल्हेरचे सरकार आणि त्यामुळे त्यांना आजही पंचक्रोशीत सरकार म्हणून ओळखतात. अमृता शिंदे यांना चार मुले यामध्ये सर्वात थोरले शामराव, त्यानंतर रघुनाथ, शिवाजी व दिनकर असे मोठे कुटुंब होते.

दिनूनाना यांचे भाऊ रघुनाथ शिंदे हे मुळातच शिस्तप्रिय व धाडसी वृत्तीचे होते व स्वातंत्र्यसेनानी होते व त्यांचेच बाळकडू घेऊन सर्वच भावंडांनी आपल्या क्षेत्रात गगनभरारी घेतली.  

दिनूनानांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या पत्नी विमल नेहमीच त्यांच्या बऱ्या वाईट प्रसंगाच्या जवळून साक्षीदार होत्या. त्यांना तीन मुले. विद्या, पल्लवी व विशाल. तर त्यांचा नातू आशिष यांनी बोरगावचे उपसरपंच पद भूषविले आहे.आई वडिलांच्या संस्काराचा व नीतीमूल्यांचा पगडा नेहमीच या मुलांच्यावर राहिला आहे.  दिनूनाना आपल्या कार्यकर्तृत्वात कधीही निष्क्रिय झाले नाहीत. आपल्या वडिलांनी दिलेली शिस्तीची शिकवण ते आपल्या मुलांना द्यायचे. स्वच्छता, नीटनेटकेपणा या बाबीबद्दल सुद्धा ते आपल्या मुलांना नेहमी  सांगत असत.

दिनूनाना हे आध्यत्मिक विचाराचे होते. त्यांचा स्वभाव मुळातच मायाळू, जिज्ञासू, प्रांजल असा होता.कौटुंबिक जबाबदारी पेलत त्यांनी शेतीबरोबर उद्योगधंद्यामध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांचे समग्र जीवन म्हणजे कष्ठाची, संघर्षाची आणि संकटाची फार मोठी लढाई होती. या लढाईत ते कधीच खचले नाहीत.उलट मोठ्या धैर्याने प्रत्येक परिस्थितीला ते सामोरे गेले.

२००८ साली त्यांना जीबीएस नावाच्या रोगाने जखडले परंतु प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी त्या रोगावर मात केली. २०१२ साली मोठे बंधू रघुनाथ शिंदे यांच्या निधनानंतरही दिनूनाना यांनी आतापर्यंत कुटुंब एक ठेवले. त्यांचे एकत्र कुटुंब आजही बोरगावला आदर्श उदाहरण आहे. नानांनी कोणताही निर्णय घेतला की तो तडीस लावायचे.

दिनूनाना यांना घरातील व बाहेरील सर्वच मुलाबद्दल नेहमीच कौतुक व गौरव वाटायचा. ते नेहमी हसऱ्या चेहऱ्याने सर्वाना ओळख द्यायचे. अतिशय भावुक स्वभाव. कोणीतरी अंधअपंग त्यांना दिसला की त्याला मदत दिल्याशिवाय पुढे जात नसत. नेमके हे सर्व गुण त्यांच्या मुलामध्ये पाहायला मिळतात.अखेरपर्यंत ते सकाळी फिरायला जायचे. सकाळी नाष्ठा करून आपल्या कामास बाहेर पडले की दुपारचे जेवण व रात्री जेवण याव्यतिरिक्त त्याचा आहारनियम काहीही नसायचा.

शेवटपर्यंत ते स्वावलंबी व आनंदी जगले. त्यांचे नातवंडांच्यावर खूप प्रेम होते.

मला जाणीवपूर्वक सांगावेसे वाटते की त्यांनी एक बाप, भाऊ व कुटुंबप्रमुख म्हणून आजवर जे काही केलंय ते शब्दात मांडणे खूप अवघड आहे.ज्या प्रकारे ते स्वतः जगले, सर्वाना जगायला शिकवले, कुटुंबाचा सर्वांगीण विकास केला त्याच मूल्य या जन्मात फेडणे शक्य नाही.  म्हणूनच त्यांच्यासारखी कुटुंबवात्सल्याची जाण, सद्विचारांची जोड, प्रामाणिकपणा, स्वाभिमान, संयम व प्रत्येक कार्य पूर्णत्वास नेण्याची दूरदृष्टी आम्हास लाभो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आज दिनूनाना आपल्यामध्ये नाहीत पण त्यांच्या विचारांचा वारसा आजही आमच्यामध्ये जिवंत आहे. अशा या महामानवास विनम्र अभिवादन!


*प्रा.डॉ.संदीप वाटेगावकर*

बोरगाव.

Comments

Popular posts from this blog

संत श्री बाळूमामा